दर्जीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या दर्जी फाऊंडेशनतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. आपल्या मनोगतात प्रा.गोपाल दर्जी म्हणाले की, आधुनिक काळामध्ये युवकांना छत्रपती शाहू महाराज विचार अंगीकृत करणे ही काळाची गरज आहे. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली, छत्रपती शाहू महाराज त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
शिक्षण ही उध्दाराची जननी आहे. सध्याची आपली गुंतवणूक म्हणजे फक्त कौशल्ययुक्त. शिक्षण असायला हवे. प्रत्येकाला समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण ही ज्ञानगंगोधरी आहे. असे मत प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ. ज्योती दर्जी, व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.